Sunday 17 February 2019

Anandi Gopal

आनंदी गोपाळ
PC: Google Images

निशब्द!... काही अनुभव असतात असे, निशब्द करणारे. त्यातलाच एक म्हणजे "आनंदी गोपाळ"- विलक्षण अशा एका जोडप्याची कथा- जी आपल्याला भारावून टाकते आणि विचार करायला लावते- काय असतं या लोकांमध्ये जे पुढचा विचार करतात, माणसांच्या विचारांना बदलवतात, प्रवाहाच्या विरुद्ध जातात, क्रांती आणतात- असं काहीतरी करून दाखवतात जे पहिले कोणी केलेलं नसतं, ते घडलेलं नसतं!

हाडामासाची माणसं- तुमच्या आमच्यासारखी, त्यांना वेगळं बनवतं तर त्यांचा जिग्गर- कोणत्याही दिव्याला सामोरे जाण्याची तयारी, कशाचीही परवाह ना करता, आपला  comfort zone सोडून, तो निर्धार आणि त्याला न्याय देण्याची चिकाटी आणि अट्टहास! त्यांनी त्यांचा प्रण जपला, सगळ्यांच्या पलीकडे, स्वतःचाही, आणि स्वतःचा अंशनि अंश समर्पित केला त्या एका कार्यासाठी! आणि म्हणूनच त्यांचे नावं इतिहासात अजरामर आहे.

पण असे वागणे, जे बरोबर ते बरोबर आणि जे चूक ते चूक, हे सहज का नसावे, आज सुद्धा?
कळत, नकळत, समाजाच्या रचलेल्या व्यवस्थेला- मग ती चुकीचे असली तरी, प्रश्न विचारता आपण मान्य करतो, ग्रांटेड घेतो. कदाचित, चूक- बरोबर, हे असंच असावं, हे समाजाने सांगण्याची गरज नाहीच आहे, परमेश्वराने प्रत्येकाला ती समज दिली आहे. बहुतेकदा, आपण accept करायला कचरतो, कारण नकळत, त्या खोकल्या विचारांनी, भीतीने आपल्या मनात घर केलेला असतं.

"लोकं काय म्हणतील?"- या विचारांनी कित्येक स्वप्नांचा बली घेतलेला असावा. पण यांनी ते करून दाखवलं- अडचणींवर, आव्हानांवर मात करत. त्या काळात जेव्हा असं करणे तर दूर, असं स्वप्न बघायचीही मुभा नव्हती.
गोपाळराव- ज्यांनी आनंदीबाईंना हे स्वप्न बघायचं बळ दिलं. समाजाच्या  बुरसटलेल्या विचारांचा कणा मोडण्यासाठी थोडा विक्षिप्तपणा गरजेचं होता, जो गोपाळरावांकडे होता. कधी कधी आव्हानं घेणं सोपं असतं, स्वप्न बघणंही, पण त्यासाठी लागणारं धारिष्ट्य, सामर्थ्य, कसरत, नेमकेपणा आणि जिद्द हे जास्त गरजेचं आणि महत्वाचं असतं. ते गोपाळरावांनी केलं- घरच्या कामांपासून ते समाजाचा तिरस्कार, अवहेलने झेलणं आणि त्याने कमजोर पडता लढत राहणं, शेवट पर्यंत. त्यांच्या शिक्षणासाठी फिरले- कल्याण, ठाणे, कोल्हापूर, कोलकाता आणि मग अमेरिका! खूप प्रयत्नानंतरही ते आनंदीबाई बरोबर अमेरिकेला जाऊ शकत नव्हते, म्हणून तिला एकटीला पाठवले. आनंदीबाईंची तयारी बघता, जेव्हा त्यांनाही त्यांच्या धाडसाचे कुतूहल वाटले तेव्हा आनंदीबाई बोलल्या, "स्वप्न एवढं मोठं आहे, तर धाडसही मोठं ठेवायला पाहिजे ना." इथून आपण शिकलं पाहिजे.

१६ वर्ष्यांचे असताना त्या अमेरिकेला गेल्या Woman's Medical College of Pennsylvania मध्ये वैदकीय शिक्षण घेतले- भारतातल्या पहिल्या, तिथे शिक्षण घेणाऱ्या. १८८६ मध्ये त्या MD झाल्या- भारतातील पहिल्या महिला डॉक्टर! कोल्हापूर मधल्या अल्बर्ट हार्वर्ड हॉस्पिटल मध्ये त्या महिला वॉर्डच्या  physician-in-charge झाल्या. पण दूर्देवी, वयाच्या २१ व्य वर्षीच टीबीमुळे त्यांचे निधन झाले.
आज, शुक्र ग्रहावरच्या एका crater ला त्यांचं नाव देण्यात आले आहे.

वैयक्तिक दुःख, डोंगराएवढे आव्हानंही त्यांचा ध्यास मोडू शकली नाही. त्यांची हिम्मत, निष्ठा पाहून सर्व काही ठेंगे वाटते. आणि एवढ्या कालांतरानेही त्या रूढी परंपरा, स्त्री हक्कांसाठीचा संघर्ष बघून मन हैरान होते, तर आपल्यातील संकीर्ण विचारांची, शंका- कुशंकेची आणि लाचारेची लाज वाटते. आज सर्व काही सुविधा असताना, जेव्ह आपण हार मानतो, स्वतःवर भरोसा वाटत नाही, तेव्हा त्यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला हवे.

म्हणतात, एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण आनंदीबाई, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानाडे- यांच्या कथा जाणल्यावर लक्षात येते कि "एका यशस्वी स्त्री मागेही एक पुरुष होता!"


© प्रियांका सरोदे